जेएनएन, मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाने आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. भारताने पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने रविवारी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून ट्रॉफी जिंकली. 25 वर्षांनंतर, जगाला भारतात एक नवीन विश्वविजेता मिळाला आहे.
अभिनंदन प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली
आयसीसी महिला विश्र्वचषकावर पहिल्यांदाच भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. याबाबतच्या अभिनंदन प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संघाच्या या घवघवीत यशाबाबत गौरवोद्गार काढले.
या खेळाडूंना मिळणार रोख बक्षिस
भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधाना, जेमिमा रॉड्रीग्ज आणि राधा यादव यांना या ऐतिहासिक विजयातील भागीदारीसाठी रोख पारितोषिकाने गौरवान्वित करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत मंजुर करण्यात आला.
