जेएनएन, मुंबई. Uber Shuttle Service in Mumbai. मुंबई उपनगरामध्ये गेल्या काही काळापासून परिवहन विभागाची कोणतीही परवानगी न घेता सुरु असलेल्या उबर शटल बसेसचा मुद्दा पुन्हा विधानसभेत गाजला. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सरकारवर टीका करताना औचित्याच्या मुद्द्यावरुन सांगितले की, तीन दिवसांपूर्वीही त्यांनी सदनात हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, अद्याप सरकारने कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
पटोले यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित करताना विचारले की, या अवैध बस सेवा प्रकरणात सरकारची काही मिलीभगत तर नाही ना? तसेच त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र देऊन या बसेसवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावर मंत्री सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना संबधित कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.
हे ही वाचा -Uber Shuttle : ‘उबर शटल बस’ सेवा प्रकरणात मोठी अपडेट; नाना पटोलेच्या मागणीवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश!
विधानसभेत काय म्हणाले पटोले?
औचित्याच्या मुद्द्यावरुन बोलताना पटोले म्हणाले की, ‘‘मी हा मुद्दा आधीच सभागृहात उपस्थित केला होता, पण अद्याप सरकारने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की, या प्रकरणात सरकारची मिलीभगत तर नाही ना? मुंबईत चालू असलेली ही मोठी लूट आहे, ज्यामुळे राज्य सरकारला आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, ‘‘सदनात आमदार जे प्रश्न उपस्थित करतात, त्यांना सरकार गांभीर्याने घेत नाही. त्यामुळेच अजूनही कोणतीच ठोस कारवाई झाली नाही, अशी टीका पटोले यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी मंत्री सरनाईक यांना पत्र पाठवून मुंबईत अवैधपणे चालवण्यात येणाऱ्या उबर शटल बसांवर कारवाईची मागणी केली आहे.
परिवहन आयुक्तांना कारवाईचे आदेश – सरनाईक
मंत्री प्रताप सरनाईक यांनी नाना पटोले यांच्या पत्राची दखल घेत परिवहन आयुक्तांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. लवकरच या कंपनीशी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाईल आणि त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला जाईल, असे ही प्रताप सरनाईक म्हणाले.