मुंबई  Mumbai local train timetable: पश्चिम रेल्वेच्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचे सुधारित वेळापत्रक लागू झाले आहे. प्रवाशांची मागणी, गर्दीचे व्यवस्थापन आणि उपलब्ध रेल्वे मार्गांचा अधिक प्रभावी वापर लक्षात घेऊन या वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले आहेत. एकूण लोकल फेऱ्यांची संख्या मात्र 1,414 इतकीच कायम ठेवण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे 1 सप्टेंबर 2026 पासून उपनगरीय रेल्वेचे सुधारित वेळापत्रक लागू करणार आहे. प्रवाशांची सोय वाढवणे आणि प्रवासाची मागणी पूर्ण करणे या उद्देशाने हे बदल करण्यात येत असल्याचे एका अधिकृत निवेदनात सोमवारी सांगण्यात आले.

या नवीन वेळापत्रकानुसार एकूण 1,414 उपनगरीय सेवांची (फेऱ्यांची) अंमलबजावणी सुरूच राहील. यात सहा नवीन सेवा सुरू केल्या जातील — ज्यामध्ये 'अप' (Up) दिशेने दोन आणि 'डाऊन' (Down) दिशेने चार सेवांचा समावेश असेल — तर सध्याच्या सहा सेवा बंद केल्या जातील.

आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांमधील वातानुकूलित (AC) सेवांची संख्याही 145 वरून 147 पर्यंत वाढेल. तसेच, शनिवार आणि रविवारी एकूण 116 वातानुकूलित सेवा चालवल्या जातील.

सहा नव्या लोकल फेऱ्या

नव्या वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वेवर दोन अप आणि चार डाउन अशा सहा नवीन उपनगरीय सेवा सुरू करण्यात आले आहेत. मात्र या सहा सेवा सुरू करताना कमी मागणी असलेल्या सहा विद्यमान फेऱ्या रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण सेवांच्या संख्येत वाढ झालेली नाही. 

    नव्या सेवांमध्ये भाईंदर–विरार लोकल सकाळी 7.46 वाजता भाईंदरहून सुटून 8.12 वाजता विरारला पोहोचेल. तसेच बोरिवली–भाईंदर लोकल रात्री 10.14 वाजता, बोरिवली–विरार लोकल रात्री 10.51 वाजता आणि आणखी एक बोरिवली–भाईंदर लोकल रात्री 12.28 वाजता सुटणार आहे. याशिवाय वांद्रे–चर्चगेट लोकल सकाळी 11.58 वाजता आणि विरार–बोरिवली रात्री 11.51 वाजता धावणार आहे. 

    सहा जुन्या फेऱ्या रद्द

    नवीन सेवा सुरू करण्यासाठी सहा विद्यमान लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये BO94137, BCL90359, BO90483, BCL90911, BO94138 आणि BO90540 या सेवांचा समावेश आहे. यापैकी दोन एसी फास्ट सेवा आहेत. 

    एसी लोकलच्या फेऱ्यांमध्येही वाढ

    पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या प्रवाशांसाठीही महत्त्वाचा बदल केला आहे. आठवड्याच्या दिवसांतील एसी उपनगरीय सेवांची संख्या 145 वरून 147 करण्यात आली आहे. चर्चगेट–बोरिवली एसी लोकल सायंकाळी 5.28 वाजता, तर बोरिवली–चर्चगेट एसी लोकल सायंकाळी 6.24 वाजता धावणार आहे. 

    काही लोकलच्या मार्गात बदल

    नव्या वेळापत्रकात केवळ नवीन सेवा सुरू करण्यापुरते बदल मर्यादित नाहीत. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन काही लोकलचे मार्ग वाढवण्यात, काही सेवा एकत्र करण्यात आले आहेत.

    दादर–विरार सेवा 90677 आणि विरार–दादर सेवा 93033 यांचे एकत्रीकरण करण्यात आले असून, ही सेवा दादरहून सायंकाळी 5.22 वाजता सुटणार आहे. तसेच विरारहून सकाळी 8.23 वाजता सुटणारी VR92046 ही सेवा आता चर्चगेटपर्यंत धावणार आहे. VR92069 या सेवेलाही चर्चगेटपर्यंत विस्तार देण्यात आला आहे. 

    काही लोकल बोरिवलीला थांबणार नाहीत

    गर्दीचे नियोजन करण्यासाठी काही जलद सेवांच्या थांब्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. चर्चगेटहून सायंकाळी 6.22 वाजता सुटणारी VR94113 एसी लोकल आणि सायंकाळी 7.05 वाजता सुटणारी VR90791 या दोन्ही सेवा बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत. तसेच चर्चगेट–बोरिवली एसी स्लो सेवा BO94029 आता गोरेगावपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

    प्रवाशांनी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन

    एकूण लोकल फेऱ्यांची संख्या कायम असली तरी वेळा, मार्ग, थांबे आणि काही सेवांचे गंतव्य बदलल्यामुळे नियमित प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी नेहमीच्या लोकलच्या वेळेत बदल झाला आहे का, हे प्रवासापूर्वी तपासून घेण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.