मुंबई. Mumbai Rain Update: मुंबईसह पश्चिम उपनगरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सर्वाधिक फटका मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेला बसला असून पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या विलंबाने धावत आहेत. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये तब्बल पाच फूट पाणी साचल्याने हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
लोकल 10 ते 20 मिनिटे विलंबाने -
रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील अनेक लोकल गाड्या 10 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील सेवांवरही पावसाचा परिणाम दिसून येत असून सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
अंधेरी सबवेत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पूर्व-पश्चिम दळणवळण ठप्प झाले आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद करून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. सबवेतील पाणी उपसण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणा कार्यरत आहेत.
#WATCH | Maharashtra: Morning visuals from Marine Drive as rain lashes various parts of Mumbai. pic.twitter.com/mXseb0pXHp
— ANI (@ANI) July 1, 2026
दरम्यान, शहरातील सायन, कुर्ला, दादर, वांद्रे, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवलीसह अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली आहे. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलले असून कार्यालयीन वेळेत प्रवाशांना मोठा विलंब सहन करावा लागत आहे.
हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरांसाठी पुढील काही तासांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, सखल भाग आणि पाण्याने भरलेल्या रस्त्यांपासून दूर राहावे तसेच रेल्वे आणि वाहतूक विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
