मुंबई. विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरात एका बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या बहिणीचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे तिघेही विरार (पश्चिम) येथील ग्लोबल सिटी परिसरातील ‘गार्डन एव्हेन्यू’ इमारतीच्या 'डी' विंगमधील फ्लॅट क्रमांक 1203 मध्ये राहत होते. गुरुवारी या बंद फ्लॅटमधून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

कुमार मनसुखलाल मेहता (वय 50), दिपेश मनसुखलाल मेहता (वय 52) आणि खेवणा मनसुखलाल मेहता (वय 48) अशी मृतांची नावे आहेत. तिघांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

मृत्यूपूर्वी गुजराती भाषेत एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, त्यात आपल्या आजारपणाची व हलाखीच्या परिस्थितीची व्यथा मांडल्याचे तपासात समोर आले आहे.

बंद फ्लॅटमधून दुर्गंधी, घटनेचा उलगडा

माहितीनुसार, विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील के 3के अव्हेन्यू (K3 K Avenue) या इमारतीच्या डी विंगमधील फ्लॅट क्रमांक १२०३ मध्ये ही घटना घडली. संबंधित फ्लॅट बंद होता. फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने इमारतीतील रहिवाशांनी सोसायटीच्या सचिवांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

माहिती मिळताच बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर पोलिसांना तिघांचे मृतदेह आढळून आले. एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा मृत्यू झाल्याचे समोर येताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली.

    पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाकडून तपास

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

    प्राथमिक तपासात तिघांनी विषप्राशन केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हा केवळ प्राथमिक अंदाज असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. तिघांचा मृत्यू नेमका कधी झाला आणि त्यामागील परिस्थिती काय होती, याचाही तपास सुरू आहे.

    आर्थिक अडचणींच्या शक्यतेचाही तपास

    माहितीनुसार, मृतांपैकी एक जण कर्करोगाने ग्रस्त होता. तसेच कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याची माहितीही समोर आली आहे. या बाबींची पोलीस पडताळणी करत आहेत. मात्र, या परिस्थितीचा तिघांच्या मृत्यूशी नेमका संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपास आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मृत्यूमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.