जेएनएन, मुंबई. Mumbai Bengaluru Vande Bharat Sleeper Express: मुंबई ते बेंगळुरू असा लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेकडून नवी सुविधा उपलब्ध होत आहे. मुंबई-बेंगळुरू मार्गावर अत्याधुनिक वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस सुरू करण्यात येत आहे. या ट्रेनमुळे सुमारे 1118 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 15 तास 50 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. विशेष म्हणजे, रात्री मुंबईतून प्रवास सुरू करून दुसऱ्या दिवशी दुपारी बेंगळुरूला पोहोचता येणार आहे.

या नव्या रेल्वे सेवेमुळे मुंबई, पुणे, सोलापूरसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील प्रमुख शहरांमधील रेल्वे संपर्क अधिक वेगवान होणार आहे. ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावणार असून, प्रवाशांसाठी एसी थ्री टियर, एसी टू टियर आणि फर्स्ट एसी असे तीन पर्याय उपलब्ध आहे. 

मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपरचे वेळापत्रक

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ट्रेन क्रमांक 27651 रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता ही गाडी बेंगळुरूच्या सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल (SMVT) येथे पोहोचेल. म्हणजेच मुंबई ते बेंगळुरू हा प्रवास 15 तास 50 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

दुसरीकडे, बेंगळुरूहून ट्रेन क्रमांक 27652 संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी मुंबईत दाखल होईल. या प्रवासासाठी 16 तास 10 मिनिटे  लागणार आहे.

मुंबईहून बेंगळुरूकडे जाणारी गाडी मंगळवारी धावणार नाही, तर बेंगळुरूहून मुंबईकडे येणारी गाडी सोमवारी धावणार नाही.

    महाराष्ट्रातील कोणत्या स्थानकांवर थांबणार?

    मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसला मार्गात आठ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कल्याण, पुणे आणि सोलापूर या तीन महत्त्वाच्या स्थानकांचा त्यात समावेश आहे.

    गाडीचे थांबे पुढीलप्रमाणे :

    • कल्याण
    • पुणे
    • सोलापूर
    • कलबुर्गी
    • यादगीर
    • रायचूर
    • गुन्टकल
    • अनंतपूर

    या मार्गामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील प्रवाशांना थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. विशेषतः पुणे आणि सोलापूरमधील प्रवाशांसाठी रात्रीच्या प्रवासाचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.