जेएनएन, मुंबई. BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र न लढल्याचा सर्वात मोठा फटका उद्धव ठाकरे गटाला बसल्याचं स्पष्ट होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात जागावाटपावर एकमत न झाल्याने अनेक प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण नव्हे तर थेट स्पर्धा पाहायला मिळाली. याचा थेट फायदा भाजप आणि महायुतीला झाला, तर उद्धव ठाकरे गटाची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाली आहे.

मतविभाजनाचा फायदा भाजपला

मुंबई ही शिवसेनेचा बालेकिल्ला मानली जात होती. मात्र याच मुंबईत ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही. अनेक प्रभागांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार परस्परांविरोधात उभे राहिल्यामुळे मतांचं मोठं विभाजन झालं. या मतविभाजनाचा फायदा घेत भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवारांनी अनेक जागांवर बाजी मारली.

काहीशे मतांच्या फरकाने ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत 

विशेष म्हणजे ज्या प्रभागांमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी अजित पवार यांच्यात थेट लढत झाली, तिथे भाजपचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर असूनही विजयी झाले. काही ठिकाणी तर अवघ्या काहीशे मतांच्या फरकाने ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले. या पराभवामागे महाविकास आघाडीचं एकत्र न येणं हे प्रमुख कारण मानलं जात आहे.

उद्धव ठाकरे का पराभूत झाले?

    महाविकास आघाडी एकसंघपणे लढली असती, मुंबईतील काँग्रेसची मते विभाजीत झाली नसती अंदाज काँग्रेसच्या नेत्यांकडून लावला जात आहे.मुंबई महापालिकामध्ये मवियामध्ये समन्वयाचा अभाव, जागावाटपातील वाद आणि स्वतंत्र उमेदवारीमुळे ठाकरे गटाचं मोठं नुकसान झालं आहे.

    ‘मराठी माणूस’ आणि ‘अदाणी प्रकल्प’ हे दोन्ही मुद्दे प्रभाव टाकण्यात अपयशी?

     मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमकपणे उपस्थित केलेले ‘मराठी माणूस’ आणि ‘अदाणी प्रकल्प’ हे दोन्ही मुद्दे मतदारांवर अपेक्षित प्रभाव टाकण्यात अपयशी ठरल्याचं निवडणूक निकालांवरून स्पष्ट झालं आहे. प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी अनेक सभांमधून हे मराठी माणूस आणि अदाणीला विकास कामे दिली जाते असे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले होते. मात्र प्रत्यक्ष निकालात मनसेला त्याचा फारसा फायदा झालेला दिसून येत नाही.

    शहरी मतदारांच्या दैनंदिन प्रश्नांपेक्षा दुय्यम धरले?

    निवडणूक प्रचारात राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी माणसाच्या हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला. परप्रांतीय, रोजगार, फलकांवरील मराठी भाषा आणि मुंबईवरील मराठी अस्मितेचा मुद्दा त्यांनी जोरकसपणे मांडला. त्याचबरोबर मुंबईतील अदाणी समूहाशी संबंधित प्रकल्प, जमिनी आणि सत्ताधाऱ्यांशी असलेल्या जवळिकीवरूनही त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. मात्र हे दोन्ही मुद्दे शहरी मतदारांच्या दैनंदिन प्रश्नांपेक्षा दुय्यम ठरल्याचं निकालातून दिसून येत आहे.सोबत राज ठाकरेमुळे उद्धव ठाकरे यांना सुद्धा मोठा फटका बसला आहे. 

    मुंबईकर मतदारांच्या दृष्टीकोनातून…

    मुंबईकर मतदारांनी यावेळी पाणी, रस्ते, ड्रेनेज, पुनर्विकास, झोपडपट्टी सुधारणा, कचरा व्यवस्थापन आणि भ्रष्टाचार यांसारख्या स्थानिक नागरी प्रश्नांना अधिक प्राधान्य दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भावनिक आणि वैचारिक मुद्द्यांपेक्षा स्थानिक नेतृत्व, उमेदवारांची प्रतिमा आणि संघटनात्मक ताकद निर्णायक ठरली.

    अनेक ठिकाणी मनसे तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर 

    मनसेने अनेक प्रभागांमध्ये जोरदार लढत दिली, पण ती मतांमध्ये रूपांतरित करता आली नाही. काही ठिकाणी मनसेची मतं निर्णायक ठरली असली तरी बहुतांश ठिकाणी मनसे तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. यामुळे ‘मराठी’ आणि ‘अदाणी’ या मुद्द्यांवर उभारलेला राज ठाकरेंचा प्रचार अपेक्षित राजकीय फायदा मिळवून देण्यात अपयशी ठरल्याचं चित्र आहे. 

    गर्दीचं रूपांतर मतांमध्ये झालं नाही

    राज ठाकरेंचा आक्रमक प्रचार शैली आणि व्यासपीठावरील भाषणांना गर्दी मिळाली, पण त्या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर झालं नाही. सोशल मीडियावर मुद्दे गाजले, प्रत्यक्ष मतदानात मात्र मनसेला त्याचा फायदा झाला नाही. 

    मतदारांना भुरळ घालण्यात अपयशी

    दरम्यान, निकालानंतर मनसे गोटात आत्मपरीक्षण सुरू असल्याची माहिती आहे. संघटना मजबूत करणे, स्थानिक प्रश्नांवर सातत्याने काम करणे आणि महापालिका स्तरावर विश्वासार्ह पर्याय उभा करणे, यावर पुढील काळात भर दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    मुंबई महापालिका निवडणूक मनसेसाठी महत्त्वाची मानली जात होती. मात्र या निवडणुकीत राज ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे मतदारांना भुरळ घालण्यात अपयशी ठरल्याने मनसेसमोर पुढील राजकीय वाटचालीसाठी मोठं आव्हान उभं राहिलं आहे.