जेएनएन, मुंबई: विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष माहीम विधानसभा मतदारसंघाकडे लागले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांचा पराभव करणारे महेश सावंत उद्धव ठाकरे यांचा हुकूमी एक्का ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या धावपळीत त्यांनी चोवीस तास स्वत:ला झोकून दिले होते. निवडणुकीतील ताण वाढल्याने, ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सावंत यांना सध्या डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघातून विजयानंतर, मातोश्री बंगल्यावर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, विधानसभेच्या धावपळीमुळे त्रास झाल्याने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

महेश सावंत यांना सकाळी अस्वस्थ वाटत असल्याने, त्यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन तपासणी केली. त्यावेळी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. मात्र, अँजिओग्राफी केल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आल्याचे समोर आले होते. त्यानंतर, महेश सावंत यांना डॉक्टरांकडून अँजिओप्लास्टीचा सल्ला देण्यात आला. पुढील काही दिवस त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे भेटीसाठी लीलावतीत जाणार!
उद्धव ठाकरे यांचा हुकूमी एक्का महेश सावंत यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात जाणार असल्याची माहिती आहे. महेश सावंत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून, उद्धव ठाकरे यांनी तब्बेतीची विचारपूस केली आहे.