जेएनएन, मुंबई. अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात गँगस्टर अनिल पंडित याच्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाणारे रणदीप मलिक याचे नाव चर्चेत आले आहे. गोळीबार प्रकरणातील शूटर रेहान हा रणदीप मलिक यालाही माहिती देत असल्याची माहिती समोर आल्याने तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचतात, याकडे लक्ष लागले आहे.
टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारानंतर अनिल पंडित याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता रणदीप मलिक याचे नाव समोर आल्याने तपासाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेहान हा केवळ अनिल पंडितच्या संपर्कात होता की अन्य व्यक्तींनाही हल्ल्याबाबत माहिती देत होता, याचा तपास ही पोलीस करत आहे.
रणदीप मलिक याची कथित भूमिका, त्याचे संपर्क आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांची माहिती तपास यंत्रणा मिळवत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, त्याचा इतर गुन्हेगारी प्रकरणांशी कथित ग्रेनेड हल्ल्यांशी संबंध आहे का, याचीही चौकशी होण्याची केली जात आहे.
आरोपी कुणालने अनिल पंडितकडून घेतले 80 हजार रुपये
दरम्यान, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांकडून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी कुणाल याला अनिल पंडित याने 80 हजार रुपये पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिल्याची माहिती आहे. हे पैसे शस्त्र पोहोचवण्यासाठी देण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
तपासानुसार, कुणाल हा आधीपासूनच अनिल पंडितच्या संपर्कात होता. शस्त्राची व्यवस्था करणे आणि ते संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवणे, यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या व्यवहारामागील नेमकी भूमिका, पैशांचा वापर आणि शस्त्र कोणाकडून कोणाकडे पोहोचवण्यात आले, याचा तपास केला जात आहे.
80 हजार रुपयांच्या कथित व्यवहारामुळे या प्रकरणात आर्थिक व्यवहारांची साखळी आणि आरोपींमधील संपर्क तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पैशांव्यतिरिक्त अन्य आर्थिक व्यवहार झाले होते का, तसेच गोळीबाराच्या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
