मुंबई. Tiger Shroff Car Firing Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील संशयितांनी गोळीबाराच्या आधी अंधेरी पूर्व येथील ‘आरआर रेसिडेन्सी’ हॉटेलमध्ये मुक्काम केल्याचे तपासातून समोर आले आहे. हॉटेलमधील २०१ क्रमांकाची खोली सध्या तपास यंत्रणांच्या केंद्रस्थानी असून, तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि खोलीत सापडलेल्या कथित पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जात आहे.
माहितीनुसार संशयितांनी 14 ते 18 ऑक्टोबरदरम्यान या हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते. गोळीबाराच्या घटनेपूर्वी आरोपींच्या हालचाली, शस्त्राची उपलब्धता आणि गुन्ह्याच्या नियोजनाबाबत माहिती मिळवण्यासाठी गुन्हे शाखा विविध पुरावे तपासत आहे.
रूम नंबर 201 तपासाच्या केंद्रस्थानी
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेतला. या तपासादरम्यान अंधेरी पूर्वेतील आरआर रेसिडेन्सी हॉटेलमधील खोली क्रमांक 201 महत्त्वाची समोर आली आहे. संशयितांनी या खोलीत काही दिवस मुक्काम केला होता. या काळात त्यांनी कोणाशी संपर्क साधला, खोलीत कोण आले-गेले आणि गुन्ह्याच्या नियोजनासाठी तेथे काही हालचाली झाल्या का, याची चौकशी केली जात आहे.
माहितीनुसार, खोलीत शस्त्राची चाचणी करताना गोळी झाडली गेली आणि ती बेडवर लागली होती. या घटनेचा तपास करताना खोलीतील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि संशयितांकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी केली जात आहे. संबंधित खोली पोलिसांनी सील केल्याचेही माहिती आहे.
सीसीटीव्हीत निळी बॅग घेऊन जाणारी व्यक्ती
या प्रकरणात हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरत आहे. माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजून 12 मिनिटांनी एक व्यक्ती हॉटेलमधून निळी बॅग घेऊन बाहेर पडताना दिसते. त्यानंतर सुमारे एका मिनिटाने अन्य दोन व्यक्ती दुचाकीवरून निघाल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या व्यक्तींच्या हालचाली आणि त्यांनी वापरलेल्या वाहनांचा मागोवा घेऊन गोळीबाराच्या ठिकाणापर्यंतचा प्रवास तपासला जात आहे. निळ्या बॅगेत पिस्तूल होते का, तसेच संबंधित व्यक्तींचा गोळीबारातील सहभाग नेमका काय होता, याची स्वतंत्रपणे पडताळणी केली जात आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केल्याचा संशय
या प्रकरणाचा तपास केवळ गोळीबाराच्या घटनेपुरता मर्यादित नसून, बॉलिवूडमधील अन्य सेलिब्रिटींच्या घरांची रेकी करण्यात आली होती का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान संशयितांनी गुगलवर सेलिब्रिटींच्या घरांचे पत्ते शोधले होते. तसेच, काही रिक्षाचालकांना पैसे देऊन संबंधित ठिकाणांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या कथित रेकीमागे नेमका कोणाचा आदेश होता, कोणती ठिकाणे लक्ष्य करण्यात आली होती आणि गोळीबाराच्या घटनेशी या हालचालींचा काय संबंध आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.
