जेएनएन, मुंबई: महायुतीतील भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यातील मुंबई महापालिकेतील सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याची विश्वासार्ह माहिती आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांनंतर आता मुंबई महापालिकेसाठीही सत्तेचा तोडगा निघाल्याचे संकेत मिळत आहेत.
माहितीनुसार, मुंबई महापालिकेत महापौरपद भाजपकडे जाण्याची दाट शक्यता असून, स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरही भाजपचाच दावा राहणार आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला उपमहापौर पद देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक सहमती झाल्याचे सांगितले जात आहे.
महायुतीतील या सत्तावाटपामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत भाजप प्रथमच महापौरपद मिळवण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल आहे.स्थायी समिती अध्यक्षपद भाजपकडे राहिल्यास आर्थिक आणि प्रशासकीय नियंत्रणही भाजपकडे केंद्रीत होणार आहे.
दरम्यान, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये भाजप-शिवसेना यांच्यात ज्या पद्धतीने सत्तावाटपाचा फॉर्म्युला राबवण्यात आला, त्याच धर्तीवर मुंबईतही समन्वय साधण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून हा फॉर्म्युला ठरवण्यात असल्याची माहिती आहे.
हेही वाचा: बैठकीसाठी सुनेत्रा पवार मुलांसह मुंबईत दाखल; ‘देवगिरी’ बंगल्यावर पहाटेच आगमन
