जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार या पहाटे पाचच्या सुमारास मुंबईत दाखल झाल्या. त्या आपल्या दोन्ही मुलांसह मुंबईतील त्यांच्या निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ बंगल्यावर पोहोचल्या आहे.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या प्रश्नावर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचे मुंबईत आगमन महत्त्वाचे मानले जात आहे.
माहितीनुसार, पहाटेच मुंबईत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षातील काही ज्येष्ठ नेते आणि निकटवर्तीयांशी प्राथमिक चर्चा केल्याचेही बोलले जात आहे. ‘देवगिरी’ बंगल्यावर आज दिवसभरात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची ये-जा वाढण्याची शक्यता असून, बैठकीपूर्वी महत्त्वाच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड, पक्षाची पुढील दिशा, तसेच सरकारमधील भूमिकेबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून निवड होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची पुढील वाटचाल कशी असेल, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
आजच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची अपेक्षा आहे.सुनेत्रा पवार यांचा राजकारणातील सक्रिय प्रवेश अधिक औपचारिक स्वरूपात होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता; उद्या पक्षाची बैठक
हेही वाचा: मोठी बातमी: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, पार्थ पवार राज्यसभेत? उपमुख्यमंत्रीपदावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
