ठाणे. भटक्या कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी पळताना एका 18 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आलीय. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ही घटना घडली.

हर्षल शिंदे असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो आपल्या मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेच्या शनिनगर परिसरात मित्रांना सोडण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे एक महिला भटक्या कुत्र्यांना अन्नपदार्थ खायला घालत होती. यावेळी तिथलाच एक भटका कुत्रा हर्षल शिंदे आणि त्याच्या मित्राच्या अंगावर धावून आला व त्यांच्या पाठीमागे लागला. कुत्रा चावेल म्हणून हर्षल जीवाच्या आकांताने पळू लागला. कुत्रा मागे पळताना पाहून हर्षलने परिसरातील एका दुकानात आश्रय घेतला. मात्र, पळताना दम लागून त्याला श्वास घेण्यात त्रास जाणवू लागला. पळता-पळताच तो कोसळला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे.

बदलापुर ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याची तीन वर्षापूर्वी बायपास सर्जरी झाली होती. कुत्रा मागे लागल्यानंतर भीतीने त्याला हार्ट अटॅक आला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हर्षलच्या मृत्यूच्या कारणांचा तपास केला जात आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.