ठाणे. Thane Crime News:  ठाणे शहर आणि आसपासच्या परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्ये एका प्रसिद्ध युट्यूबरची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हरेश गजवानी असे हत्या झालेल्या युट्यूबरचे नाव आहे. या हत्येप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आणि ठाणे गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या २४ तासांच्या आत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

गोळीबार करून तीक्ष्ण हत्याराने वार

उल्हासनगरमध्ये हरेश गजवानी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हत्येच्या या घटनेमुळे उल्हासनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरवस्तीत अशा प्रकारे हत्या झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप तपासातून स्पष्ट झाले नाही. वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य व अन्य काही कारणातून हा हल्ला झाला का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

विठ्ठलवाडी पोलिसांसह गुन्हे शाखेची कारवाई

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विठ्ठलवाडी पोलिस आणि ठाणे गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत तीन संशयितांना ताब्यात घेतले. या संशयितांची चौकशी सुरू असून, हत्येतील त्यांची नेमकी भूमिका काय होती, तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

    हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र, गोळीबारामागील कारण आणि आरोपींनी गुन्ह्याचे नियोजन कशा प्रकारे केले, याबाबत तपासातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.