जेएनएन, लातूर: लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यातच दोन गट आमने-सामने आल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.

वाद उफाळल्याने कार्यक्रमाला गालबोट

या मेळाव्यासाठी मुंबईचे आमदार आणि संपर्कप्रमुख मंगेश कुडाळकर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळल्याने कार्यक्रमाला गालबोट लागलं. जिल्हाप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.

मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात

दरम्यान, दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकत शाब्दिक चकमकी करत होते. काही काळ परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, उपस्थित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांत केलं आणि वाद निवळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहे. 

वरिष्ठांकडून लवकरच बैठक घेण्याची शक्यता

    या घटनेमुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली असून संघटनात्मक एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे वाद टाळण्याचं आव्हान पक्ष नेतृत्वासमोर उभं राहिलं आहे.  दरम्यान, या घटनेनंतर पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठांकडून लवकरच बैठक घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.