जेएनएन, मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरण अत्यंत गंभीर आणि संतापजनक असल्याचे सांगत या घोटाळ्यामागील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली.

या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि कठोर चौकशी केली जाईल. दोषी कोणत्याही पदावरील असो किंवा कोणत्याही संघटित टोळीचा भाग असो, त्याला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. संबंधितांवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकार भ्रष्टाचाराविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवत असून, पेपरफुटीसारखे प्रकार हे केवळ गैरव्यवहार नसून संघटित गुन्हेगारीचे स्वरूप धारण करणारे गंभीर गुन्हे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तत्पर आणि सतर्क कारवाईचे कौतुक केले. गुप्त माहितीच्या आधारे तातडीने छापे टाकून पोलिसांनी लाखो मेहनती आणि प्रामाणिक उमेदवारांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचवले, असे त्यांनी सांगितले.

टीईटी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना दिलासा देताना शिंदे म्हणाले की, परीक्षा लवकरात लवकर पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पद्धतीने पुन्हा घेतली जाईल. कोणत्याही प्रामाणिक उमेदवाराच्या हक्कावर गदा येऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त, गुणवत्तापूर्ण आणि अधिक सक्षम बनवणे हे महायुती सरकारचे ठाम ध्येय असून, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

हेही वाचा: TET Exam 2026: पेपर फुटल्याने टीईटी परीक्षा रद्द! नवीन तारखेबाबत आयोगाकडून मोठी अपडेट