जेएनएन, ठाणे: राज्यात गाजलेल्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ता याला अखेर बिहारमधून अटक करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून त्याचा शोध सुरू असताना भिवंडी पोलिसांनी विशेष पथकाच्या मदतीने ही कारवाई केली.
माहितीनुसार, अटकेनंतर वीरेंद्र कुमार गुप्ताला बिहारमधून विमानाने पुणे विमानतळावर आणण्यात आले आहे. पुणे विमानतळावरून त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात भिवंडी येथे नेण्यात येणार असून, त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणात गुप्ताची भूमिका महत्त्वाची मानली जात असून, पेपरफुटीच्या संपूर्ण रॅकेटबाबत त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा तपास यंत्रणांना आहे. त्याच्या चौकशीतून या प्रकरणातील इतर आरोपी, आर्थिक व्यवहार तसेच पेपरफुटीच्या साखळीबाबत नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कारवाईमुळे टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची अपेक्षा असून, या प्रकरणातील इतर संशयितांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
