जेएनएन, मुंबई: मुंबईकरांसाठी रविवारी रेल्वे प्रवासाचे नियोजन करताना महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेने रविवारी (उद्या) ठाणे–कल्याण आणि ठाणे–वाशी/नेरूळ या मार्गांवर नियमित देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे या मार्गांवरील लोकल सेवा काही प्रमाणात प्रभावित होणार असून प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

ठाणे ते कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यानही ब्लॉक असल्याने काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहे. तर काही गाड्या बदललेल्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. परिणामी, सकाळपासून दुपारपर्यंत प्रवाशांना अतिरिक्त गर्दीचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान शनिवारी रात्री विशेष रात्रकालीन ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक रात्रीच्या वेळेत देखभाल कामांसाठी घेण्यात येत असल्याने त्याचा परिणाम केवळ उशिराच्या लोकल सेवांवर होणार आहे.

मात्र, रविवारी दिवसभर पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक नसल्याने चर्चगेट ते विरार आणि डहाणू रोड मार्गावरील लोकल सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना रविवारी दिवसा कोणत्याही ब्लॉकचा फटका बसणार नाही.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी अधिकृत वेळापत्रक तपासण्याचा तसेच आवश्यकतेनुसार पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रभावित मार्गांवरील प्रवाशांनी अतिरिक्त वेळ राखून प्रवास करावा, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Ashadhi Ekadashi 2026: तीन पिढ्यांची वारी आणि विठ्ठलभक्तीचे फळ; धाराशिवच्या बाबासाहेब-प्रभावती माने यांना मिळाला शासकीय महापूजेचा मान