जेएनएन, मुंबई. दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या लोकभवनात एनसीपी नेत्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (Sunetra Pawar oath ceremony) घेतली. राज्यपाल आचार्य दैवव्रत यांनी त्यांना मंत्री पदाची शपथ दिली.
सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर समाज माध्यमांवर पहिली प्रतिक्रिया शेअर केली आहे. ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
तसंच, दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन, असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार…
“आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.
दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन.
या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.” असं त्यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे.
