जेएनएन, मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पोकळीची भर घालण्यासाठी पक्षाने हालचालींना वेग दिला असून, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी संधी देण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडणार असून संध्याकाळी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. या निवडीनंतर तात्काळ त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडू शकतो. पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक वातावरण असून, बहुसंख्य आमदारांचा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या घडामोडींना दुजोरा दिला. “अजित पवार यांच्या निधनामुळे पक्षावर मोठा आघात झाला आहे. नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असून, ती भरून काढण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा लागेल. सुनेत्रा पवार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याबाबत चर्चा सुरू आहे,” असं भुजबळ यांनी सांगितलं.

सुनेत्रा पवार आतापर्यंत सक्रिय राजकारणात फारशा दिसल्या नसल्या, तरी अजित पवार यांच्या निधनानंतर त्या कुटुंबासह पक्षाच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवं नेतृत्व पुढे येणार आहे.

एकीकडे शोकाकुल वातावरण असतानाच, दुसरीकडे पक्षाच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुढील वाटचाल कशी करणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

हेही वाचा: मोठी बातमी: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, पार्थ पवार राज्यसभेत? उपमुख्यमंत्रीपदावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अजित पवार कोणता निर्णय घेणार होते? जवळच्या मित्राने सांगितले दादांची शेवटची इच्छा