जेएनएन, सोलापूर. Solapur Latest News: सोलापुरात मुसळधार पाऊस झाला आहे. तसंच, बार्शी तालुका आणि शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बार्शी-तुळजापूर रस्त्यावरील अशोका गार्डनजवळील रेल्वे ब्रिजखाली साचलेल्या पाण्यात एक बस अडकली होती. ज्यामध्ये 27 प्रवासी अडकून पडले होते. मात्र, बार्शी शहर पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवत, बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे.

बसमध्ये शिरले पाणी 

बार्शी शहर आणि तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून, वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अशोका गार्डनजवळील रेल्वे ब्रिजखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने, त्याखालून जाणाऱ्या एका बसने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने बस मध्यभागीच अडकली आणि त्यात पाणी शिरू लागले. यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दिली भेट

घटनेची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ बचावकार्य सुरू करत, त्यांनी अडकलेल्या बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या या प्रसंगावधानाने आणि तत्परतेमुळे कोणताही अनर्थ घडला नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले.

कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

    या घटनेमुळे पुन्हा एकदा पावसाळ्यात रेल्वे ब्रिजखाली साचणाऱ्या पाण्याचा आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

    वाहतुकीवर परिणाम

    सोलापुरात आज पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांत सोलापूर-पुणे महामार्ग भागात झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात सोलापुराकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता.