जेएनएन, मुंबई. मुंबईच्या घाटकोपरमधील अशोक नगर येथील गौसिया चाळ परिसरात पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास डोंगराचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. दरड दोन ते तीन घरांवर कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले.
घटनेनंतर अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि इतर बचाव पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. तब्बल सहा ते सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आतापर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्याप काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची प्राथमिक माहिती असून बचावकार्य सुरूच आहे.
मृतांच्या वारसांना 4 लाख, जखमींना 50 हजारांची मदत
मुंबईतील कुर्ला (पश्चिम) येथील अशोक नगर, टेकडी क्रमांक 3 येथे बुधवारी पहाटे भूस्खलन होऊन डोंगरउतारावरील माती व ढिगारा 2 ते 3 घरांवर कोसळला. दुर्घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. मृतांच्या वारसांना 4 लाख रुपये, तर जखमींना वैद्यकीय उपचारासाठी 50 हजार रुपये मदत देण्याची घोषणा महापौरांनी केली. बचावकार्य वेगाने आणि समन्वयाने करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले
