जेएनएन, नवी दिल्ली. राज्यात ऑपरेशन टायगरची (Operation Tiger) जोरदार चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाचे 9 पैकी पाच ते 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशा चर्चांना उधाण आले आहे. तसंच, अशीही माहिती आहे की, हे खासदार दिल्लीत दाखल झालेले आहेत. आणि ते लोकसभा अध्यक्षाकडे आपल्या पाठिंब्याची माहिती देणार आहेत. यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवले आहे.

अरविंद सावंतांची मुख्य मागणी 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही कथित फुटीर गटाला किंवा विभक्त गटाला स्वतंत्र मान्यता, दर्जा, विशेषाधिकार देऊ नयेत, अशा आशयाचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना लिहून या पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय त्यावर कोणताही निर्णय घेऊ नये

पक्षाच्या खासदारांच्या गटाने आपण स्वतंत्र गट असल्याचं सांगितल्यास किंवा तसा दावा केल्यास अशा प्रकारची कोणतीही विनंती प्राप्त झाल्यास, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आपल्या कार्यालयासमोर आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय त्यावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी भूमिका अरविंद सावंतांनी मांडली आहे. 

पत्रात केला थेट दहाव्या सुचीचा उल्लेख

    घटनात्मक तत्त्वांशी विसंगत असणाऱ्या कोणत्याही कृतीसंदर्भात आवश्यक त्या कायदेशीर उपाययोजना करण्याचा, तसेच दहाव्या अनुसूचीतील तरतुदींचा अवलंब करण्याचा पक्षाचा अधिकार अबाधित राहील, हे अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिल्या पत्रात नमूद केलं आहे. 

    सविस्तर पत्र - 

      उद्धव ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे (Shivsena UBT 9 MP Name)

      1. अरविंद सावंत
      2. अनिल देसाई
      3. राजाभाऊ वाजे
      4. संजय दिना पाटील
      5. संजय जाधव
      6. संजय देशमुख
      7. नागेश पाटील आष्टीकर
      8. ओमराजे निंबाळकर
      9. भाऊसाहेब वाकचौरे

      कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा?

      1. संजय जाधव
      2. संजय देशमुख
      3. नागेश पाटील आष्टीकर
      4. ओमराजे निंबाळकर
      5. भाऊसाहेब वाकचौरे

      हेही वाचा - Operation Tiger: ठाकरे गटाचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला? दिल्लीतून आली मोठी बातमी