जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 20 मे रोजी मुंबईतील वाय. बी. सेंटर येथे पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.संघटनात्मक बांधणी आणि पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी यांच्यासह नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पराभूत झालेले उमेदवार देखील उपस्थित राहणार आहेत. पराभूत उमेदवारांनाही बैठकीसाठी विशेष निमंत्रण देण्यात आल्याने पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
माहितीनुसार, राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष विस्तार आणि जनसंपर्क अभियान यावर बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच आगामी काळात पक्षाची आक्रमक भूमिका कशी असावी, विरोधकांविरोधात कोणती रणनीती आखावी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी कोणते कार्यक्रम राबवायचे यावरही मार्गदर्शन होण्याची शक्यता आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांच्या मतदारसंघनिहाय आढाव्यावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पराभवाची कारणे, संघटनात्मक कमतरता आणि भविष्यातील तयारी यावर थेट संवाद साधला जाणार आहे.
दरम्यान, नेशनलिस्ट कांग्रेस(शरदचंद्र पवार ) पक्षासाठी ही बैठक आगामी राजकीय दिशा ठरवणारी असणार आहे.
हेही वाचा : Pune Bus Accident: बेल्हे येथे एसटी बस खोल खड्ड्यात कोसळली, 25 प्रवासी थोडक्यात बचावले
