जेएनएन, ठाणे. कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील बेल्हे भागातील गुंजाळवाडी फाटा परिसरात एक भीषण अपघात घडला. येथे रविवारी सायंकाळी एसटी बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन खोल खड्यात कोसळली. भिवंडी डेपोची ही बस असल्याची माहिती आहे.
25 प्रवासी थोडक्यात बचावले
गुंजाळवाडी फाटा परिसरात झालेला हा अपघात इतका भीषण होता की बस पलटी होऊन तिची चाके वर झाली. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून 25 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. जखमी चालकासह इतर प्रवाशांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसचा क्रमांक MH14BT4023 असून ती भिवंडी डेपोची असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बस थेट खोल खड्यात जाऊन उलटली
अधिकच्या माहितीनुसार, धावत्या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट महामार्गाखालील खोल खड्यात जाऊन पडली. रविवारी सुट्टी असल्याने बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती.
ग्रामस्थ तातडीने धावले मदतीसाठी
अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमध्ये एकच आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले. ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.
