जेएनएन, मुंबई. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दाद मागितली आहे.

कथित आर्थिक व्यवहाराची चौकशी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) सोपवावी, अशी मागणी राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे. हे प्रकरण मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कक्षेत येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपशी संबंधित काही व्यक्तींच्या संभाषणाचा उल्लेख आहे. या संभाषणात जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची धार कमी करण्यासाठी रणनीती आखली जात असल्याचा आणि त्यांच्या नावाने 500  कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. या रकमेसाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा माध्यम म्हणून वापर झाल्याचा आरोपही या प्रकरणातून करण्यात आला आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची सत्यता आणि त्यातील व्यक्तींची ओळख स्वतंत्रपणे सिद्ध झालेली नाही.

अमित शाहांना पत्र लिहून ईडी चौकशीची मागणी 

संजय राऊत यांनी अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात 500 कोटी रुपये नेमके कुठून आले, ते कोणाकडे देण्यात आले आणि प्रत्यक्षात मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचले का, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. कथित व्यवहारातील पैशांचा स्रोत आणि त्यांचा प्रवास तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राऊत यांनी आपल्या पत्रात भाजपवर राजकीय पक्ष, खासदार, आमदार आणि निवडणुकांमध्ये पैशांचा वापर केल्याचा आरोप करत, आता आंदोलनेही पैशांच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला आहे. मनोज जरांगे पाटील यांना 500 कोटी रुपये देण्यासाठी भाजपने श्रीकांत शिंदे यांच्याकडे पैसे दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी संबंधित यंत्रणांनी चौकशी करावी, अशी त्यांची मागणी आहे.

    कथित व्यवहाराचे स्वरूप आणि पैशांच्या स्रोताबाबत प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी या प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपवण्याची विनंती केली आहे.

    ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरण तापले

    या प्रकरणाची सुरुवात मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या 500 कोटी रुपयांच्या आरोपांपासून झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत कथित ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये जरांगे यांच्या आंदोलनाचा राजकीय परिणाम, त्यांची प्रतिमा आणि आंदोलनाला निष्प्रभ करण्याच्या कथित रणनीतीबाबत चर्चा असल्याचा दावा करण्यात आला आहे.