जेएनएन, मुंबई. अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, परिसरात येणाऱ्या वाहनांवरही लक्ष ठेवले जात आहे. सलमानच्या घराबाहेर दोन पोलीस चौक्या उभारण्यात आल्याची आणि घरात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानसह काही बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. सलमानच्या घराबाहेर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आले आहे. टायगर श्रॉफ वर हल्ला करणाऱ्या आरोपींनी यापूर्वी सलमानच्या घराची रेकी केली होती. आरोपीने कडक सुरक्षा पाहून दुसऱ्या लक्ष्याकडे वळल्याचा संशय तपासात समोर आले आहे. या माहितीची पडताळणी तपास यंत्रणा करत आहेत. 

सलमान खानला यापूर्वीही धमक्या मिळाल्या असून, त्याच्या घराबाहेर गोळीबाराची घटनाही घडली होती. त्यामुळे टायगर श्रॉफ प्रकरणानंतर त्याच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे.

परदेशी आणि गावठी पिस्तुलांचा वापर? 

दरम्यान, टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारासाठी एका परदेशी बनावटीच्या आणि एका गावठी पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.यापैकी कोणते पिस्तूल परदेशी बनावटीचे आहे, याची माहिती पोलीस यंत्रणा तपासात आहे.  

गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपींनी दोन्ही पिस्तुले फेकून दिल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे ही शस्त्रे नेमकी कुठे फेकण्यात आली, याचा शोध मुंबई पोलिसांकडून घेतला जात आहे. घटनास्थळी सापडलेले काडतुसांचे अवशेष, गोळ्यांचे स्वरूप आणि जप्त करण्यात येणारी शस्त्रे यांची तपासणी केल्यानंतर वापरलेल्या पिस्तुलांबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.