रत्नागिरी. Ganpatipule Temple Dress Code: कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात भाविकांसाठी वस्त्रसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2017 पासून मंदिरात वस्त्रसंहितेचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात गणपतीपुळे संस्थानकडून मंदिर परिसरात सूचना फलक लावण्यात आले असून, भाविक आणि पर्यटकांना नियमांची पूर्वकल्पना देण्यात आली आहे.
गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळांपैकी एक आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येथे श्री गणपतीच्या दर्शनासाठी येतात. मंदिरात येताना भाविकांनी धार्मिक स्थळाची पवित्रता आणि शिस्त राखावी, यासाठी संस्थानकडून वस्त्रसंहितेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शॉर्ट्स, बर्मुडा घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही-
संस्थानने लावलेल्या सूचनाफलकाद्वारे भाविकांना मंदिरात येताना योग्य व सुसंस्कृत पोशाख परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शॉर्ट्स, बर्मुडा यांसारख्या तोकड्या पोशाखांवर मंदिरात प्रवेशासाठी बंदी असणार आहे. भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येताना वस्त्रसंहितेचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मंदिर प्रशासनाकडून या निर्णयाची माहिती अचानक देण्यात आलेली नाही. गेल्या काही काळापासून वस्त्रसंहितेबाबत भाविकांना माहिती देण्यात येत असून, आता १ जानेवारी २०२७पासून तिची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
काही महिन्यांपासून दिली जात आहे पूर्वकल्पना
वस्त्रसंहितेबाबत भाविक आणि पर्यटकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने परिसरात सूचना फलक लावले आहेत. त्यामुळे गणपतीपुळ्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी संस्थानने निश्चित केलेल्या पोशाखाच्या नियमांची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणपतीपुळे संस्थानचे ट्रस्टी डॉ. विवेक भिडे यांनी वस्त्रसंहिता यापूर्वीच लागू करण्यात आली असल्याचे सांगितले. मात्र, 1 जानेवारी 2027 पासून तिची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटकांनाही नियमांचे पालन करावे लागणार
गणपतीपुळे हे धार्मिक स्थळासोबतच पर्यटनस्थळ असल्याने येथे देशभरातून पर्यटक येतात. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाने आणि पर्यटकाने वस्त्रसंहितेचे पालन करणे अपेक्षित आहे. मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून धार्मिक वातावरण आणि मंदिराची शिस्त कायम ठेवण्याचे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे.
1 जानेवारी 2027 पासून नियमांची कडक अंमलबजावणी होणार असल्याने गणपतीपुळ्याला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी पोशाखाची काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.
