जेएनएन, मुंबई: राज्यात मराठी भाषेच्या समर्थनात आणि हिंदी सक्तीचा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 18 जुलैला मीरा भाईंदर येथे जाहीर सभा घेणार आहेत. ही सभा मराठी भाषेच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात येत असून मराठी भाषेची शक्ती दाखविण्यासाठी ही सभा होणार आहे. मुंबई उपनगर शहरातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांना व त्यांच्या हक्कांना वाचा फोडण्याचा उद्देश मनसेचा आहे.
सभेला उद्धव ठाकरे येणार का?
मीरा भाईंदरच्या सभेसाठी मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू असून, मोठ्या प्रमाणावर मराठी बांधव या सभेला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात मराठी भाषेच्या संरक्षणासाठी आणि वाढीसाठी राज ठाकरेकडून भूमिका मांडण्यात येणार आहे. मीरा भाईंदरच्या सभेला उद्धव ठाकरे येणार काय याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आली नाही.
राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
मागील काही दिवसांपासून राज्यात मराठी माणसांमध्ये भाषेच्या प्रश्नावरुन असंतोष (Language Row) पाहायाला मिळाला आहे. ठाण्यातील मीरारोड परिसरात व्यापारी संघटनांनी एक मोर्चा काढला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी भाषिकांनी मोर्चाची हाक दिली होती. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही या मोर्चात अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, मराठी भाषिक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी, मीरा भाईंदर परिसरात निदर्शने करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. यातच आता राज ठाकरे यांची सभा याठिकाणी होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे याठिकाणी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिस आयुक्तांची बदली
आंदोलनात तणाव झाल्यानंतर मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी निकेत कौशिक यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मधुकर पांडे यांची बदली ही अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मध्ये करण्यात आली आहे.