जेएनएन, मुंबई. Mira-Bhayandar New Police Commissioner: मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निकेत कौशिक यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मधुकर पांडे यांची बदली ही अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मध्ये करण्यात आली आहे. शासनाचे सह सचिव वेंकटेश माधव भाट यांनी हा बदलीचा आदेश दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मराठी न बोलल्याबद्दल एका दुकानदारावर हल्ला केला होता. त्यानंतर तेथील व्यापाऱ्यांनी एक मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या विरोधात काही संघटनांनी आणि मनसेने मिळून एक मोर्चा काढण्याचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी याला परवानगी दिली नव्हती. यातून मोर्चाच्या वेळी परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.

एकनाथ शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी याप्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, मीरा-भाईंदर येथील परिस्थिती तणावपूर्ण होण्यास पूर्णतः पोलीस जबाबदार आहेत. प्रताप सरनाईक यांनी आंदोलनस्थळीही भेट दिली होती. मात्र आंदोलकांच्या आक्रोशांना त्यांना सामोरे जावे लागले होते. 

मुख्यमंत्री काय म्हणाले होते

या आंदोलन संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते की, पोलिसांनी आंदोलन करण्यास परवानगी देण्यास नकार दिला नव्हता. तर वाहतूक आणि गर्दीचा धोका होता. म्हणून पोलिस आयुक्तांकडून मनसे नेत्यांना मार्ग बदलण्यास सांगण्यात आले होते, परंतु ते त्यांनी त्यांचा त्याच मार्गावर आंदोलन करण्याचा हट्ट होता, म्हणून त्यांना थांबवण्यात आले." कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही. आपल्याला एकाच राज्यात एकत्रित राहायचे आहे. राज्याच्या विकास करायचा आहे. जर आंदोलकांनी योग्य मार्ग मोर्चासाठी मागितला तर ती परवानगी कधीही मिळेल, आजही आणि उद्याही मिळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होते.