जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे येथील रंग शरदा येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सत्ताधारी आणि पक्षांतराच्या राजकारणावर जोरदार टीका केली. या मेळाव्याला मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये भविष्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र अशा महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकीय पक्षांकडून खासदार, आमदार आणि नगरसेवक फोडण्याचे राजकारण सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

“महाराष्ट्रात, देशात अनेक ठिकाणी, खास करून महाराष्ट्रातच दुष्काळी परिस्थिती येणार आहे आणि आमच्याकडे काय चाललंय? तर खासदार फोडणे, आमदार फोडणे, नगरसेवक फोडणे. आमची सत्ता कशी टिकेल, यासाठी वाटेल तेवढे पैसे द्यायला आम्ही तयार आहोत. माणसे विकली जात आहेत,” असे राज ठाकरे म्हणाले. 

यावेळी त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांपेक्षा जनतेने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या वेळी तासन्तास रांगेत उभे राहून नागरिक ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देतात, तेच नंतर आर्थिक किंवा राजकीय स्वार्थासाठी पक्षांतर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

“ज्यांना निवडून देण्यासाठी तुम्ही चार-पाच तास उन्हात रांगेत उभे राहिलात, तो माणूस पन्नास-शंभर कोटींसाठी विकला जातो. अशा लोकांना पुन्हा निवडून द्यायचे का, याचा विचार जनतेने करायला हवा,” असे आवाहन त्यांनी केले. 

सध्या पक्षांतर करून सत्तेच्या राजकारणात सहभागी झालेल्या नेत्यांना भविष्यात पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरवले गेले, तर मतदारांची त्यावर काय प्रतिक्रिया असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

    राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राज्यातील पक्षांतराच्या राजकारणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मेळाव्यात त्यांनी संघटनबांधणी, जनतेशी संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचे निर्देशही पदाधिकाऱ्यांना दिले.