मुंबई/नवी दिल्ली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या आंदोलनावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून, या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपवर जोरदार टीका केली आहे. आंदोलनाच्या वेळी विरोधकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र काँग्रेस मुख्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना अभय दिले जाते, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. या मोहिमेचे हादरे भाजपला बसू लागले असले, तरी या धक्क्यातून सावरत भाजप पुन्हा आपल्या नेहमीच्या राजकीय पद्धतीने विरोधकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात भाजप आंदोलन करत असल्याचा टोलाही पक्षाने लगावला.

विरोधकांवर पोलिसांची कारवाई, भाजपला अभय?

राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी बुधवारी जंतरमंतर येथे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना फरफटत नेऊन वाहनात कोंबले, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. विरोधी पक्षांच्या इतर खासदारांनाही अशाच प्रकारे आंदोलनस्थळावरून हटवण्यात आले,त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा पक्षाने केला.

दुसरीकडे, गुरुवारी राहुल गांधी आणि विरोधी पक्षांचे खासदार महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी राजघाटावर पोहोचले होते. त्याचवेळी भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर जमून राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या आंदोलनावेळी पोलिसांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना रोखले नाही, असा दावा ठाकरे गटाने केला. विरोधकांच्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते; मात्र सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांच्या आंदोलनाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते, असा आरोपही पक्षाने केला.

    ‘लोकशाही वाचवणाऱ्यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन’

    काँग्रेस मुख्यालयासमोर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह भाषेत घोषणाबाजी केल्याचा आरोप करत ठाकरे गटाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना आंदोलन करताना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागते.मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यासाठी मोकळीक दिली जाते, असा आरोप पक्षाने केला.