जेएनएन, मुंबई. लाडक्या गणपती बाप्पाला मुंबईकरांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात आणि जड अंत:करणाने निरोप देण्यास सुरुवात केली. शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईच्या विविध भागांत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ झाले. मात्र, मोठ्या आणि मानाच्या गणेशमूर्तींच्या भव्य मिरवणुकांमुळे अनेक ठिकाणी विसर्जनाची प्रक्रिया शनिवारी सकाळपर्यंतही सुरूच होती.

दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवरही मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी भाविकांची गर्दी कायम होती. लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी यांसारख्या मानाच्या गणपतींच्या विसर्जनाची प्रतीक्षा भाविकांना होती. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी सुरू झाली होती आणि शनिवारी पहाटे त्याचे गिरगाव चौपाटीवर आगमन अपेक्षित होते.  

दरम्यान, मुंबईच्या पूर्व उपनगरातील पवई तलाव परिसरातही शनिवारी सकाळी असेच भक्तिमय आणि मनोहारी दृश्य पाहायला मिळाले. मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकामागोमाग रांगेत उभ्या होते. निर्माणाधीन मेट्रो मार्गाच्या पुलाजवळ विविध मंडळांच्या भव्य मूर्ती विसर्जनाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसून आले. 

या रांगेत मुंबईतील उंच गणेशमूर्तींपैकी एक असलेल्या साकीनाक्याचा महाराजा याचाही समावेश आहे. सुमारे 45 फूट उंचीची ही भव्य मूर्ती पवई तलाव परिसरात विसर्जनाच्या प्रतीक्षेत होती. उंच आणि आकर्षक मूर्ती एकाच ठिकाणी रांगेत उभ्या असल्याने हा परिसर भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

बाप्पांच्या रांगेचे मनोहारी दृश्य 

पवई तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठमोठ्या गणेशमूर्ती एकामागोमाग उभ्या असल्याचे दृश्य पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने थांबत होते. विविध रंगांची आकर्षक सजावट, रोषणाई आणि फुलांनी सजवलेल्या गणेशमूर्तींमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. 

    गणेशमूर्तींच्या या रांगेचे दृश्य भाविकांसाठी आनंददायी असले, तरी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) परिसरात वाहनांची मोठी गर्दी झाली. मोठ्या मूर्ती घेऊन जाणारी वाहने, मिरवणुका आणि भाविकांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. 

    अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर विसर्जन मिरवणुका निघाल्याने वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण आला. प्रवाशांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.