ठाणे. Pradeep Purnekar murder case: ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काही व्हिडीओ आणि दृश्यफितींच्या आधारे गंभीर आरोप केले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे हे या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. या व्हिडीओमध्ये राजेंद्र शिंदे यांच्यासोबत पप्या शिंदे, नितेश पवार आणि संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली हे दिसत असल्याचे राम पूर्णेकर यांनी सांगितले. या नव्या दाव्यांमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
पत्रकार परिषदेत व्हिडीओ सादर
राम पूर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत काही दृश्यफिती दाखवून या प्रकरणातील संशयित व्यक्ती आणि आरोपी यांच्यातील कथित संबंधांकडे लक्ष वेधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्हिडीओमध्ये राजेंद्र शिंदे हे पप्या शिंदे, नितेश पवार, संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित सिंग ऊर्फ पपलू यांच्यासोबत दिसतात. या दृश्यफितींच्या आधारे संबंधित व्यक्तींची भूमिका तपासण्याची मागणी त्यांनी केली.
पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे. आता नव्याने सादर केलेल्या व्हिडीओमुळे या प्रकरणातील तपासाची दिशा आणि पोलिसांची पुढील कारवाई याकडे लक्ष लागले आहे.
26 दिवसांनंतरही न्याय मिळाला नसल्याची खंत
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला 26 दिवस उलटूनही कुटुंबीयांना न्याय मिळालेला नसल्याची खंत राम पूर्णेकर यांनी व्यक्त केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, आपल्या मागणीनुसार संबंधितांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणीही राम पूर्णेकर यांनी पुन्हा केली. तपास यंत्रणांनी उपलब्ध पुरावे गांभीर्याने तपासून या प्रकरणातील कथित सूत्रधाराची भूमिका स्पष्ट करावी, अशी त्यांची भूमिका आहे.
पोलिसांच्या तपासाकडे लक्ष
या प्रकरणात यापूर्वीही राम पूर्णेकर यांनी पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे सादर केल्याचा दावा केला होता. तसेच, गुन्ह्यातील कथित सूत्रधाराची भूमिका तपासून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. नव्याने समोर आणलेल्या दृश्यफितींच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
