जेएनएन, मुंबई. दिवंगत वसंत डावखरे यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे (Prabodh Davkhare) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडला.

तुमच्यापाठीमागे संपूर्ण पक्ष भक्कमपणे उभा

दिवंगत वसंत डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली होती. अनेक वर्षे ते विधानपरिषदेचे सभापती होते. अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख होती असे सांगतानाच  शिव - शाहू - फुले - आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे यांनी प्रवेश केला आहे. प्रबोध डावखरे यांना पक्षात चांगली वागणूक मिळेल. त्याचबरोबर तुमच्यापाठीमागे संपूर्ण पक्ष भक्कमपणे उभा असेल असा शब्द छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.   

प्रबोध डावखरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते खासदार पार्थ पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केला. यावेळी प्रमोद डावखरे यांनी वडिलांच्या वेळी ठाण्यात राष्ट्रवादीचे जसे वर्चस्व होते ते वर्चस्व पुन्हा आणण्याचा निर्धार पक्षप्रवेश झाल्यावर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

यावेळी प्रबोध डावखरे यांचे पक्षात दिलीप वळसे - पाटील यांनी स्वागत केले. प्रमोद डावखरे हे पक्ष संघटना निश्चितच मजबूत करतील असा विश्वासही दिलीप वळसे - पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिलीप वळसे - पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार प्रतापराव चिखलीकर - पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, युवक नेते व प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.