जेएनएन, मुंबई. राज्यातील विविध महामंडळे आणि शासकीय उपक्रमांवरील नियुक्त्यांबाबत महायुतीमध्ये अखेर प्राथमिक फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी महामंडळ वाटपाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता पुढील महिनाभरात यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

महायुतीतील महामंडळांच्या वाटपात भाजपला सर्वाधिक 48 टक्के वाटा मिळणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 29 टक्के आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 23 टक्के महामंडळे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

राज्यातील अनेक महामंडळे, प्राधिकरणे आणि मंडळांवरील नियुक्त्या गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापना झाल्यानंतर आता या नियुक्त्यांकडे महायुतीने गांभीर्याने लक्ष दिले आहे. विविध इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांकडूनही पक्ष नेतृत्वाकडे जोरदार लॉबिंग सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

माहितीनुसार, कोणते महामंडळ कोणत्या पक्षाकडे जाणार यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, त्याबाबतची रूपरेषा तयार करण्यात आली असून महायुतीच्या पुढील समन्वय बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यानंतर महामंडळांतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य पदांचे वाटप निश्चित केले जाईल. 

महत्त्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संयुक्त बैठकीत अंतिम यादीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत महायुतीतील अनेक इच्छुकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, महामंडळ वाटपावरून महायुतीतील अंतर्गत समतोल राखण्याचे मोठे आव्हान नेतृत्वासमोर असणार आहे. प्रादेशिक, जातीय आणि पक्षीय समीकरणांचा विचार करून नियुक्त्या करण्यात येणार असल्याने या प्रक्रियेकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.