जेएनएन, मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिप सार्वजनिक केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. क्लिपमधील संभाषणापेक्षा ती सार्वजनिक कशी झाली, याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा
पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आरक्षण मिळणार की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांना आधी सोबत घ्यायचे आणि नंतर त्यांना बदनाम करायचे, तसेच त्यांच्या समर्थकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न करायचे, असे नेमके काय सुरू आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे.
“जरांगे पाटील यांच्या विरोधात काय सुरू आहे, त्यांना बदनाम करण्याचे आणि त्यांची माणसे फोडण्याचे नियोजन कोण करत होते, हे आम्हालाही माहीत आहे,” असा दावा राज ठाकरे यांनी केला.सत्ताधाऱ्यांना इशारा देताना ते म्हणाले की, सत्ता गेल्यानंतर अनेक गोष्टी अंगलट येऊ शकतात, याचा संबंधितांनी विचार करावा.
दरम्यान, या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संबंधित ऑडिओ क्लिप सार्वजनिक कशी झाली, हा असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले. क्लिपचा स्रोत शोधून काढण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित संभाषण अडीच वर्षांनंतरच समोर का आले, त्यामागे नेमका काय हेतू आहे आणि या प्रकरणातून कोणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधली जातील, असे त्यांनी सांगितले.
संबंधित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येईल. त्यातून संभाषणाची सत्यता पडताळली जाईल. त्यानंतर आवश्यक ती चौकशी करून या प्रकरणामागील वस्तुस्थिती समोर आणली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने तसेच भाजपकडूनही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
“या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून यातील सत्य आम्ही बाहेर काढू,” असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
