जेएनएन, नागपूर: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वास्तव महाराष्ट्रासमोर आणले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्रीपद आणि सत्तेसाठी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण करून महाराष्ट्राचे मोठे नुकसान करण्यात आले, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. दरम्यान, आगामी विधान परिषद निवडणुकीत नागपूर पदवीधर मतदारसंघासह महाविकास आघाडी पाचही जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासली पाहिजे. या क्लिपच्या माध्यमातून कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असेल, तर त्यामागील सत्य जनतेसमोर आले पाहिजे. त्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

सत्तेसाठी मराठा-ओबीसी संघर्ष निर्माण केल्याचा आरोप
मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. समाजा-समाजात भांडणे लावून सत्ता मिळवण्याचे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नाही. सत्तेसाठी सुरू असलेल्या संघर्षामुळे राज्याचे नुकसान होत असून, दोन्ही पक्षांमधील मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा आता टोकाला पोहोचल्याची टीका त्यांनी केली.

राज्यातील जनतेसमोर सध्या दुष्काळ, बेरोजगारी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. तरुणांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न गंभीर बनले असताना सत्ताधारी पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी संघर्ष सुरू आहे. हे राजकारण जनतेच्या हिताचे नसून केवळ सत्तेसाठी सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या; परदेश दौऱ्यांना प्राधान्य नको
शेतकऱ्यांना परदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरही वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना सरकारने सर्वप्रथम शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाहीत आणि शेती संकटात आहे. अशा परिस्थितीत केवळ अभ्यास दौरे आयोजित करून सरकारची जबाबदारी संपत नाही, असे ते म्हणाले. सरकारने केवळ १८० शेतकऱ्यांना परदेशात पाठवण्याऐवजी एक हजार शेतकऱ्यांना ही संधी द्यावी. राज्यातील प्रत्येक विभागातून किमान २०० शेतकऱ्यांची निवड करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याची टीका करत, शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत देण्याची आणि दुष्काळ निवारणाला प्राधान्य देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.

    विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पाच जागांचा विश्वास
    आगामी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी पाचही जागांवर विजय मिळवेल, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पुण्यातील दोन्ही जागांसह छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती येथील जागांवरही महाविकास आघाडी यश मिळवेल, असे ते म्हणाले.

    सदोष मतदार याद्यांवर वडेट्टीवारांचा आक्षेप
    मतदार याद्यांमधील कथित त्रुटींवरूनही वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. मतदार याद्यांमध्ये त्रुटी असणे ही गंभीर बाब असून, निवडणुकीच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होतात, असे त्यांनी नमूद केले.

    भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी मतदार याद्यांमध्ये घोळ घालावा लागतो, असा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, मतदार याद्यांमधील त्रुटींची योग्य चौकशी झाली पाहिजे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, दुसरीकडे दुष्काळ, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि मतदार याद्यांमधील कथित त्रुटी यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे या वक्तव्यावरून दिसून येते.