एजन्सी, पालघर. Palghar News Update: पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पैशांच्या वादातून एका 75 वर्षीय सासऱ्यानं जावयाची हत्या केली आहे. जावई झोपेत असताना त्याच्यावर सासऱ्यानं कुऱ्हाडीने वार करून ठार केले आणि नंतर तिथून पळ काढला, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले. ही घटना वाडा परिसरात सोमवारी-मंगळवारी मध्यरात्री घडली.

सासऱ्याकडूनही घेतले होते पैसे 

42 वर्षीय मृत व्यक्ती लोकांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा, मात्र, त्यांना नोकरीला लावत नसे, तसंच, त्यांना पैसेही परत करत नसे, त्याने आपल्या सासऱ्याकडूनही पैसे घेतले होते, त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत, असे वाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी सांगितले.

जावायावर कुऱ्हाडीने हल्ला 

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अशाच एका भांडणात आरोपीने आपल्या जावयावर कोयत्याने हल्ला केला होता आणि त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी-मंगळवारी मध्यरात्री आरोपी आपल्या जावयाच्या घरी गेला आणि तो गाढ झोपलेला असताना आरोपीने त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून पळ काढला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

    गुन्हा दाखल

    पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. मृतकाच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल केला, असे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.