जेएनएन, मुंबई. Maharashtra Politics: उबाठा गटातील मुंबई, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे, लातूरमधील विविध पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यात सांगलीचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि सोलापूरचे माजी संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

500 पदाधिकारी शिवसेनेत

यात प्रामुख्याने वरळीमधील वृत्तपत्र विक्रेता संघाचे 200 आणि तेलगू समाजाच्या 300 महिलांचा समावेश होता. तसेच अहिल्यानगर मधील प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख अभिजित पोटे, उबाठा उपजिल्हाप्रमुख आशिक दहीफळे, संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, शेवगावचे राष्ट्रवादीचे शहर प्रमुख अमर पुरनाळे यांचा समावेश होता.

अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी शिवसेनेत

तर सोलापूरचे उबाठा गटाचे माजी संपर्कप्रमुख संजय कोकाटे, जिल्हा समन्वयक सचिन सोनटक्के, मंगळवेढा तालुका संघटक मारुती वाघमारे, सांगली जिल्ह्याचे उबाठाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, मनसेचे माजी जिल्हाप्रमुख वैभव कुलकर्णी, जिल्हा संघटक बजरंग पाटील, पुणे जिल्ह्यातील उबाठा उप शहरप्रमुख नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज बाळासाहेब मालुसरे, वडगाव शेरीचे आनंद गोयल, लातूरच्या दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनंत दोरवे आणि माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच यांचा समावेश होता.

    शिवसेनेच्या कामावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश

    गेल्या अडीच वर्षात पायाभूत सुविधा आणि लोककल्याणकारी योजना यांची सांगड घालून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेनेने काम केले असून, त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पक्षाला दैदिप्यमान असे यश मिळाले आहे. तर दुसरीकडे माझ्यावर दिवसरात्र फक्त टीका करणाऱ्यांना मात्र जनतेने साफ नाकारून कायमचे घरी बसवले आहे. शिवसेनेने आजवर केलेल्या कामावर विश्वास ठेवून आपण सारे पक्षात प्रवेश करत आहात, मात्र आपल्या विभागातील जनतेचे प्रलंबित प्रश्न नक्की मार्गी लावले जातील अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी  दिली. तसेच यापुढे पक्षवाढीसाठी कार्यरत राहण्यास सांगितले.