जेएनएन, मुंबई - मंत्रालयात येणाऱ्या व्हिजिटर्सची वाढती गर्दी आता थेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर परिणाम करू लागली आहे. कॅबिनेट बैठकीच्या दिवशी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होत असल्याने कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या दिवशी फक्त सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
निर्णय का घेतला?
मंत्रालयाचा सातवा मजला म्हणजे राज्याच्या सत्ताकेंद्राचा गाभा मानला जातो. याच मजल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या केबिन्स तसेच मंत्रिमंडळ बैठकीसाठी विशेष सभागृह आहे. कॅबिनेट बैठक सुरू असताना, शेकडो व्हिजिटर्स विविध कामांसाठी या मजल्यावर गर्दी करतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाला मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा बैठकीतील चर्चेत गोंधळ निर्माण होऊन मंत्र्यांचे लक्ष विचलित होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
काय आहे नवीन नियम?
कॅबिनेट बैठकीच्या दिवशी व्हिजिटर्सना सातव्या मजल्यावर प्रवेश नाही. फक्त मंत्रिमंडळ बैठकीशी संबंधित सचिव, विभागीय अधिकारी, आणि आवश्यक कर्मचारीच प्रवेश करू शकतील. सुरक्षा यंत्रणा या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करणार आहे. मंत्रिमंडळाचे काम सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार असून या निर्णयामुळे बैठकीत होणारे अडथळे दूर होतील, तसेच मंत्र्यांना चर्चेसाठी लागणारे लक्ष आणि वेळ पूर्णपणे देता येईल, असा सरकारचा विश्वास आहे.