जेएनएन, मुंबई. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता राज्य सरकारने मेट्रो-13 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मीरा भाईंदर ते वसई-विरार असा हा मेट्रो मार्ग असून, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील प्रमुख भागांना वेगवान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

मेट्रो-13 प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ₹17,724.99 कोटी खर्च अपेक्षित आहे. मार्गाची एकूण लांबी 25.03 किलोमीटर असून त्यापैकी 21.78 किलोमीटर मार्ग उन्नत, तर 3.25 किलोमीटर मार्ग भूमिगत असणार आहे. 

16 स्थानके; 3 स्थानके भूमिगत 

मेट्रो-13 मार्गावर एकूण 16 स्थानके प्रस्तावित आहेत. यामध्ये 13 उन्नत आणि 3 भूमिगत स्थानकांचा समावेश आहे. मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसरातील प्रवाशांना या मार्गामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.या मार्गाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे वसई खाडीवरील पांजू बेटाला जोडणारा 4.92 किलोमीटर लांबीचा पूल. या पुलावर सहा पदरी रस्ता आणि मेट्रो मार्गाचे एकत्रित बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील रस्ते वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक दोन्हींना मोठी चालना मिळणार आहे. 

रेल्वे स्थानकांशी थेट जोडणी 

मेट्रो-13 मार्गाची नायगाव, नालासोपारा आणि विरार या महत्त्वाच्या उपनगरी रेल्वे स्थानकांशी जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरी सेवेतून मेट्रोमध्ये आणि मेट्रोतून रेल्वेमध्ये सहज प्रवास करता येणार आहे.तसेच, मेट्रो मार्ग क्रमांक 9 शी नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम येथे इंटरचेंज प्रस्तावित आहे. या जोडणीमुळे मीरा भाईंदर आणि वसई-विरार परिसरातील प्रवाशांना मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो नेटवर्कच्या इतर मार्गांवरही सहज जाता येणार आहे. सर्व मेट्रो स्थानकांवर बससेवा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. 

    चिखल डोंगरी येथे मेट्रो डेपो 

    मेट्रो-13 साठी चिखल डोंगरी येथे मेट्रो डेपो प्रस्तावित करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी एकूण 24.84 हेक्टर भूसंपादन अपेक्षित आहे. मार्गाच्या बांधकामासाठी आवश्यक जमीन आणि पोहोच मार्गांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर सरकारचा भर राहणार आहे.

    पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

    मेट्रो-13 प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार येत्या सहा महिन्यांत भूसंपादन आणि पोहोच मार्ग तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

    पुणे रिंगरोडलाही मंजुरी 

    याच बैठकीत पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या पुणे रिंगरोडच्या सोरतापवाडी ते वरवे-शिवरे मार्गालाही मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पुणे शहरात प्रवेश न करता बाह्यवळणाने वाहतूक वळविण्यास मदत होणार असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. 

    मेट्रो-13 आणि पुणे रिंगरोड या दोन्ही प्रकल्पांना मिळालेली मंजुरी ही मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे शहराच्या पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः मीरा भाईंदर, वसई-विरार, नालासोपारा, नायगाव आणि विरार या झपाट्याने विकसित होणाऱ्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार करण्यास मेट्रो-13 प्रकल्पामुळे मोठी मदत होणार आहे.