जेएनएन, नांदेड: देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) चौकशीनंतर शहरातील काही पालक आणि कोचिंग क्लास चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल CBI च्या पथकाने नांदेडमधील कदम कुटुंबाची तब्बल आठ ते नऊ तास चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, आपल्या मुलीसाठी कथितरीत्या पाच लाख रुपये खर्च करून प्रश्नपत्रिका मिळवण्यात आल्याचा संशय CBI ला आहे. संबंधित विद्यार्थिनीला सराव परीक्षांमध्ये साधारण 120 ते 130 गुण मिळत असताना प्रत्यक्ष NEET परीक्षेत तब्बल 560 गुण मिळाल्याने तपास यंत्रणांचा संशय बळावल्याचे सांगितले जात आहे. या गुणांमधील मोठ्या तफावतीमुळे CBI ने संबंधित कुटुंबाची सखोल चौकशी सुरू केली आहे.
चौकशीदरम्यान CBI अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार, मोबाईल संपर्क, कोचिंग क्लासेसशी असलेले संबंध तसेच परीक्षेपूर्व हालचालींची माहिती घेतल्याचे समजते. याप्रकरणी संबंधित पालकांना पुढील चौकशीसाठी पुणे येथे हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, नांदेडमध्ये CBI चौकशी सुरू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर काही पालकांनी मोबाईल फोन बंद ठेवल्याची चर्चा सुरू आहे. NEET आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या काही कोचिंग क्लास चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
CBI कडून या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण, प्रश्नपत्रिका पुरवठा साखळी आणि राज्यांमधील संभाव्य नेटवर्कचा तपास केला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: ‘लाडक्या बहिणीं’ना अखेरची संधी; ई-केवायसीऐवजी जिल्हा महिला विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा
