मुंबई (पीटीआय) -Voter Additions in Maharashtra नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात 14.71 लाख नवीन मतदारांची भर पडली आहे तर 4.09 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत परंतु एकाही राजकीय पक्षाने या संदर्भात कोणताही आक्षेप घेतलेला नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

जिल्हानिहाय आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की ठाणे येथे सर्वाधिक 2.25 लाख नवीन मतदारांची वाढ झाली आहे, त्यानंतर पुण्यात 1.82 लाख नवीन मतदारांची वाढ झाली आहे. यामुळे ठाण्यातील मतदारांची संख्या 74.55 लाख आणि पुण्यातील मतदारांची संख्या 90.32 लाखांवर पोहोचली आहे.

मुंबई उपनगरीय जिल्ह्यात 95,630 नवीन मतदारांची भर पडली, ज्यामुळे त्यांची संख्या 77.81 लाख झाली, तर मुंबई शहरात 18,741 नावे वाढली, ज्यामुळे मतदारांची संख्या 25.62 लाख झाली. राज्यातील एकूण मतदार संख्या आता 9.84 कोटी झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आगामी निवडणुका अद्ययावत यादीनुसारच -

मतदार यादीत फेरफार केल्याच्या आरोपांनी राजकीय वाद उफाळून आला असला तरीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर 14 लाखांहून अधिक नावे जोडल्याबद्दल आम्हाला आतापर्यंत एकही लेखी तक्रार किंवा आक्षेप मिळालेला नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या यादीऐवजी आता अद्ययावत यादीचा वापर आगामी नागरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी केला जाईल, असे ते म्हणाले.

4.09 लाख मतदारांना वगळले -

    नोव्हेंबरपासून महानगरात 1.14 लाख नवीन मतदारांची भर पडली आहे, ज्यामुळे आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या 1.03 कोटी झाली आहे, असे राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यभरात 16.83 लाख मतदार जोडण्यासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत, तसेच एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात नावे बदलण्यासाठी सुमारे 1.97 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.छाननीनंतर, 14.71 लाख नवीन नावे मंजूर करण्यात आली आणि 4.09 लाख मतदारांना वगळण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

    निवडणूक आयोगाने यावर्षी 30 जूनपर्यंत मतदार नोंदणीला औपचारिक परवानगी देण्यापूर्वीच राजकीय कार्यकर्त्यांनी नोंदणी मोहीम सुरू केल्याचे आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

    सुरुवातीला हे संशयास्पद वाटले, परंतु स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांना स्पष्टपणे माहिती होती की स्थानिक निवडणुकांसाठी विधानसभा यादी नव्हे तर अद्ययावत यादी वापरली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

    भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी मतदार यादीत फेरफार केले जात असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलिकडेच केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदारांच्या संख्येत झालेली वाढ डोळे विस्फारणारी आहे.

    त्यांच्या दाव्यांमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे, भाजप नेत्यांनी ते निराधार असल्याचे सांगत ते फेटाळून लावले आहे.