जेएनएन, नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airports) दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा तीव्र झाली आहे. नाव न जाहीर करता विमानतळाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळे रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्र संतापले आहे. दि.बा.पाटील यांचे नाव नाही तर उद्घाटन नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

नावावरून वाद पेटला

सरकारी स्तरावरुन 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी विमानतळ उद्घाटनाची शक्यता वर्तवली जात आहे.  दि. बा. पाटील यांच्या नावाची अंतिम अधिसूचना अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे स्थानिक बांधवांमध्ये नाराजी वाढली आहे.

6 ऑक्टोबरला विराट आंदोलन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 6 ऑक्टोबर रोजी रस्त्यावर उतरण्यात येईल, असा इशारा खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिला आहे. उद्घाटनाआधी नाव जाहीर झाले तर स्वागत आणि सत्कार केला जाईल. नाव दिले नाही तर संघर्ष होईल असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे. 

या आंदोलनात पाच लाख नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिरात बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा आणि पुढील योजना निश्चित करण्यात आली आहे. 

    अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित?

    दि. बा. पाटील यांच्या नावासाठी स्थानिकांनी आंदोलन, मोर्चे, ठराव आणि निवेदने दिली आहे. जमीन संपादनादरम्यान मानाचा प्रश्न उपस्थित केला होता. राजकीय पातळीवर पाठपुरावा केला गेला तरीही केंद्र सरकारकडून आजवर अंतिम निर्णय जाहीर झाला नाही.