मुंबई. Maharashtra Mahanagarpalika Elections 2026 : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. बोटावर लावण्याच्या शाईसह अनेक ठिकाणांहून आचारसंहिता भंगाच्या घटना समर येत आहेत. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण शर्टवर भाजपचे चिन्ह असलेले कमळ चिटकवून मतदान केंद्रात गेल्याचे समोर आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन यावरून रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीत मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रात आल्यावर त्यांच्या शर्टवर कमळाचं चिन्ह लावलेलं होतं, यावरुन संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी देखील या घटनेवर भाष्य केलं आहे.
रवींद्र चव्हाण यांच्या शर्टवर कमळाचं चिन्ह मतदानावेळी असल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर संजय राऊत यांनी सोशल मीडिया पोस्ट करून निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रन लुंगीवाले छातीवर कमळ लावून मतदानास गेले हा आचार संहितेचा भंग आहे! यांच्यावर काय कारवाई होणार? मुख्यमंत्री ठेचून काढण्याची भाषा करतात, काढा याना ठेचून.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 15, 2026
भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रन लुंगीवाले छातीवर कमळ लावून मतदानास गेले हा आचार संहितेचा भंग आहे!
यांच्यावर काय कारवाई होणार?
मुख्यमंत्री ठेचून काढण्याची भाषा करतात
काढा याना ठेचून
@supriya_sule
@Dev_Fadnavis
@ECISVEEP pic.twitter.com/GA9CFbKlGo
दरम्यान राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भात केलेल्या पोस्टबाबत विचारण्यात आलं. यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे याबाबत चौकशी करुन कारवाई केली जाईल.
दरम्यान, मुंबईत दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 41.8 टक्के, नागपूरमध्ये साडेतीन पर्यंत 41.09, नाशिकमध्ये 39.64 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
