जेएनएन, मुंबई: राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायर्तीच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान. तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी (Municipal Council Election 2025) होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

जात वैधता प्रमाणपत्राचा पुरावा 

राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मुभा देण्यासाठी शासनाने संबंधित अधिनियमात दुरुस्ती केली आहे. मात्र, असा उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून त्याला सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे, असेही श्री. वाघमारे यांनी सांगितले. 

नामनिर्देशनपत्रासाठी संकेतस्थळ 

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील. संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत (Print Out) काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक राहील.

मतदान केंद्र आणि ईव्हीएम 

    नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण 1कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असून त्यासाठी सुमारे 13 हजार 355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 13 हजार 726 कंट्रोल युनिट आणि 27 हजार 452 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. अन्य निवडणुकांच्यादृष्टीनेदेखील पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. 

    उमेदवारांसाठी खर्च मर्यादा 

    नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील थेट अध्यक्ष आणि सदस्यपदाच्या उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च मर्यादा वाढविली आहे. ती पुढलीप्रमाणेः 'अ' वर्ग नगरपरिषदः थेट अध्यक्ष-15,00,000, सदस्य- 5,00,000. 'ब' वर्ग नगरपरिषदः थेट अध्यक्ष- 11,25,000, सदस्य- 3,50,000 आणि 'क' वर्ग नगरपरिषदः थेट अध्यक्ष 7,50,000, सदस्य- 2,50,000. नगरपंचायतः थेट अध्यक्ष- 6,00,000, सदस्य- 2,25,000.