जेएनएन, मुंबई. Mumbai Rain : आज सकाळपासून मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसाने मुंबई लोकल (mumbai local train news) रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. शहर आणि उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, तर काही रेल्वे मार्गांवर कमी दृश्यतेमुळे ट्रेनचा वेग कमी करण्यात आला आहे. सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर लाईनवर लोकलच्या फेऱ्या सुरू असून 10 ते 15 मिनिटे विलंबाने रेल्वे धावत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीनही प्रमुख लोकल लाईन्स – सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर – सध्या सुरू आहेत. मात्र, पावसामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला असून, सेंट्रल लाईनवरील गाड्या 10 ते 12 मिनिटे उशिराने धावत आहेत.हार्बर लाईनवर 7 ते 8 मिनिटांचा विलंब होत आहे. वेस्टर्न लाईनवरील गाड्यांना 10 ते 15 मिनिटांने उशिराने धावत आहे.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, सततच्या पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचण्याचा धोका असल्याने ट्रेनचा वेग कमी करण्यात आला आहे. तसेच, विजेच्या पायाभूत सुविधांमध्ये काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे दृश्यता कमी झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सावधगिरी पाळली जात आहे.
प्रवाशांना सूचना!
रेल्वे पोलिसांनी आणि प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवास करण्यापूर्वी m-Indicator, Where Is My Train यांसारख्या मोबाईल अॅप्सवर ट्रेनचे थेट अपडेट्स तपासावेत. अनावश्यक गर्दी टाळावी आणि पाणी साचलेल्या प्लॅटफॉर्म किंवा मार्गांवर काळजीपूर्वक हालचाल करावी.