जेएनएन, मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्याचा मुलगा विनीत पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  

यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय चौगुले हेदेखील उपस्थित होते.

दरम्यान, महापालिका निवडणुकांमध्ये कोणाला किती जागा लढवण्यासाठी मिळणार हे महत्त्वाचे नसून  मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकवणे हे आमचे ध्येय असल्याचे सांगत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम कधीही वाजू शकतात, या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुंबईतील शाखाप्रमुखांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याशी झालेल्या संवादाबाबत पत्रकारांना माहिती दिली.

काम करणाऱ्यांना मुंबईकरांनी पसंती दिली आहे. विरोधकांची निवडणुकीमध्ये हार होते तेव्हा ते ईव्हीएम, न्यायालय, निवडणूक आयोग यांच्यावर ते आक्षेप घेतात, अशी टीकाही त्यांनी केली.