जेएनएन, मुंबई: राज्यात अतिमुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या तुफान पावसाने अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. जायकवाडी, येलदरी, उजनी, गंगापूर, गिरणा या मुख्य धरणांतून मोठ्या प्रमाणात नदीत विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.
मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. काल रात्री सुद्धा ते स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या संपर्कात होते. आज सकाळी पुन्हा त्यांनी जलसंपदा विभागाकडून एकूणच राज्याच्या स्थितीचा आढावा घेतला.
राज्यातील धरणांची स्थिती
- आज दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी 12:30 ते 1:00 या वेळेत जायकवाडी धरणाचे द्वार क्र 1 ते 9 असे एकूण 9 (आपत्कालीन द्वार) दरवाजे 0.5 + 0.5 फूट उचलून 6.0 फूट पर्यंत उघडण्यात येणार असून गोदावरी नदी पात्रात 9432 क्युसेक इतका विसर्ग वाढविण्यात येईल. त्यामुळे सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात एकूण 18 (नियमित) व 9 (आपत्कालीन) गेटमधून 198072 + 9432 = 207504 क्युसेक विसर्ग सुरू राहील, अशी माहिती जायकवाडी प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे.
येलदरी धरणातून 29,400 क्युसेकने विसर्ग
- येलदरी धरणातून 29,400 क्युसेक इतका विसर्ग होतो आहे आणि तो पूर्णपणे नियंत्रणात आहे. मांजरा आणि तेरणा नद्यांचा पूर आता ओसरला आहे.
- पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती नियंत्रणात आहे. उजनीतून 75,000 इतका विसर्ग होत असून, सीना कोळेगावमधून 80,000 क्युसेक इतका विसर्ग होतो आहे.
गंगापूर धरणातून 11,000 क्युसेकने विसर्ग
- नाशिक: गंगापूर धरणातून 11,000 क्युसेक इतका विसर्ग होत असून, मुळा धरणातून 10,000 क्युसेक विसर्ग सुरु आहे. पाऊस आता कमी झाला आहे. जायकवाडी धरणातून नाशिक, नगर भागातील धरणातून विसर्ग 87,000 वरुन 68,000 क्युसेकवर नियंत्रित केला आहे.
गिरणा धरणातून 54,500 क्युसेकने विसर्ग
- जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणातून 54,500 क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, हतनूर धरणातून 65,800 क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे.
- कोकणातील सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली आहेत.
हेही वाचा- Maharashtra Rains: महाराष्ट्रात पाणीच पाणी; ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर
राज्यात आज पावसाचा अलर्ट असलेली जिल्हे
येलो अलर्ट - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर घाट, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर,
ऑरेंज अलर्ट - पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट,